
स्थैर्य, फलटण, दि. २३ : तालुक्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी येथील मॅग्नेशिया केमिकल्सने दिवसागणिक लाखो रुपयांचा तोटा सहन करुन महाराजा मालोजीराव रौप्यमहोत्सवी रुग्णालय संचलित लाईफलाईन हॉस्पिटल या रुग्णालयाला ऑक्सिजन तयार करण्याच्या दोन मशिनरी सामाजिक बांधिलकीतुन दिल्या आहेत. या मशिनरीमुळे दररोज ऑक्सिजनचे पन्नास जंबो सिलेंडर रुग्णालयाला मिळणार आहेत.
मॅग्नेशिया केमिकल्सचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कर्नल श्रीमंत विनोद मारवाह, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, उमेश नाईक निंबाळकर, मिलिंद सुमंत व संचालक मंडळाने हा निर्णय घेतला.
मॅग्नेशिया केमिकल्सने दिलेल्या या ऑक्सिजन तयार करण्याच्या मशिनरीची किंमत सुमारे पंचवीस लाख रुपये असून ही मशिनरी रुग्णांच्या सेवेसाठी दिल्याने दिवसाला मॅग्नेशिया केमिकल्सचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. या उद्योगाचे नुकसान होत असले तरी या मशिनरीमुळे दररोज ऑक्सिजनचे पन्नास जंबो सिलेंडर रुग्णालयाला मिळणार आहेत.