स्थैर्य, कोलकाता, दि.१९: पश्चिम
बंगालमध्ये विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. त्यापूर्वीच
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आगामी विधासभा
निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली
आहे.
यातच शुक्रवारी आणखी एका तृणमूल
काँग्रेसच्या आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बंगाल कांथी
मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार बनसरी मैती यांनी आपल्या पदाचा
राजीनामा दिला आहे. दरम्यान, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस कबीरुल
इस्लाम यांनीही आपला राजीनामा दिला आहे. गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी
राजीनामा दिला आहे.
बनसरी मैती हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे. याआधी जानेवारी 2021 पर्यंत 60-65 आमदार सत्ताधारी
तृणमूल काँग्रेस सोडतील, असे राज्यातील भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह
यांनी म्हटले होते. गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज
असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी
मंत्रीपदाचा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शुभेंदु अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर टीएमसीचे आमदार जितेंद्र तिवारी
आणि शीलभद्र दत्ता यांनीही पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जितेंद्र
तिवारी हे सध्या पांडेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून
ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच, ते
तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात
रंगल्या होत्या. शुभेंदु अधिकारी 2009 पासून कांथी मतदारसंघातून तीनदा
आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2007 मध्ये शुभेंदु अधिकारी यांनी पूर्व
मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये इंडोनेशियन रसायन कंपनीविरूद्ध
भूसंपादनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण
भूमिका बजावली होती.