
दैनिक स्थैर्य । 30 मे 2025। सातारा। पुसेगाव येथील बाजारपेठेतून जाणार्या सातारा-टेंभुर्णी रखडलेले काम तातडीने पूर्ण होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत निर्णायक लढा उभारण्याची गरज आहे. यासाठी रविवारी (ता. 1) श्री सेवागिरी मंदिरात बाधित, देवस्थान ट्रस्ट आणि गावातीलसर्वपक्षीय प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करून पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जाधव पुढे म्हणाले,महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे लाखों प्रवासी, नागरिक आणि भाविकांची दररोज गैरसोय होत आहे. त्यांना ट्रॅफिकच्या मोठ्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेचे देखील मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय व इतर मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे.भूमी अभिलेखने गावातील डॉ.सुरेश जाधव यांच्या दवाखान्यापासून श्री सेवागिरी मंदिरापर्यंतच्या रस्त्याची मोजणी करून ठेकेदार कंपनीला हद्दी दाखवल्या आहेत. यापुढे ठेकेदार कंपनी, प्रशासन आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून बाधितांना विश्वासात घेऊन हा रस्ता पूर्णत्वाला जाईपर्यंत याचा पाठपुरावा केला पाहिजे, तसेच रथमार्ग आणि बाजारपेठेतून जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने महामार्गाच्या कामासोबतच दोन्ही बाजूची गटारे,पथदिवे, पाणीपुरवठा योजना आदी कामांचा आराखडा देखील तयार केला पाहिजे.
पुसेगावच्या विकासासाठी हा रस्ता पूर्ण होणे गरजेचे असल्याने काम पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. काहीही करून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी रविवारच्या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी याकडे गांभीयनि पाहावे, असा इशारा डॉ. जाधव यांनी दिला.