दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । सातारा । महात्मा फुले यांच्यानंतर शूद्रातिशूद्रांच्या प्राथमिक शिक्षणाच्या बिकट प्रश्नात हात घालणारा दुसरा महापुरुष म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. शाहू महाराजांना त्यांच्या प्रजेसाठी उच्च शिक्षण देणे महत्त्वाचे नव्हते तर प्रजेसाठी साधी कोंड्याची भाकर म्हणजे प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे होते आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थांनात सक्तिचा मोफत शिक्षणाचा कायदा केला. आणि त्याची अंमलबजावणीही केली असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय मांडके यांनी पुसेगाव येथे बोलताना केले.
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आज राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ” राजर्षी शाहू महाराजांचे कार्य , विचार व आजच्या युगाकरीता संदेश ” या विषयावर विजय मांडके बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ संजय क्षीरसागर होते.
कर्मवीर भाऊराव पाटील हे राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरात सुरू केलेल्या जैन विद्यार्थी वस्तीगृहाचे विद्यार्थी होते. तेंव्हापासून खरेतर रयत ची नाळ छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याशी व विचाराशी जुळलेली आहे असा उल्लेख करून विजय मांडके यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक , सामाजिक , सहकार , कला , उद्योग , कृषी आदी विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.
प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय क्षिरसागर यांनी शाहू महाराजांचे कार्य व त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज ,कर्मवीर भाऊराव पाटील , लक्ष्मीबाई पाटील , सेवागिरी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविक इतिहास विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. अनिल जगताप येथे केले. आभार प्रा सुधीर धोंगडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा श्रीमती मनोज सोनार यांनी केले.