दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकार्यांच्या कार्यकक्षेत डीपीसी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल ११ कोटी रूपयांची औषध खरेदी करण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकार्यांनी तात्काळ अल्पमुदतीच्या तातडीच्या निविदा काढून ही प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी वार्ड क्रमांक दोन आणि रुग्णालयातील उपलब्ध औषध साठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांनी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा चिकित्सक डॉक्टर युवराज करपे उपस्थित होते.