
स्थैर्य, सातारा, दि. ३१ : सातारा..पोलीस असल्याचे सांगून तरुण-तरुणीचे अपहरण करून त्यांना सातार्याला नेले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून अपहरणकर्त्यांना अटक केली आणि अपहृत तरुण-तरुणीची सुटका केली. चतु:श्रृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.
दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34, रा. वाघोली, सातारा), संदीप किसन जाधव (वय 28, रा. आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दीक्षित (वय 26, रा. आर्डे, सातारा), सागर अनिल कोळेकर (वय 23, रा. सुरुर, सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय 18 ), शुभम नवनाथ बरकडे ( वय 20), मंगेश रमेश शिंदे, ( वय 21), राहुल बाळासाहेब बरकडे (वय 27, चोघेही रा. लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर,( वय 23, रा. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी ऋतिक उत्तम मोहिते (वय 27, रा. पर्वती दर्शन) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार ऋतिक सेल्समन आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता तक्रारदार आणि त्यांच्या ऑफिसमधील एक तरुणी सेनापती बापट रस्ता येथील स्टार बाजार मार्केट येथे आयसीसी टॉवरजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे एक कार आली. त्यामध्ये सहा ते सात व्यक्ती होत्या. आपण पोलीस असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात जायचे आहे, असे सांगितले आणि त्यांनी या दोघांना जबरदस्तीने धक्काबुक्की करून कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना पाषाणमार्गे चांदणी चौक ते बेंगळुरू महामार्गावरून कात्रज घाटाजवळ नेले. तेथे तक्रारदार ऋतिकला मारहाण करून गाडीतून त्याला खाली ढकलून दिले. त्यानंतर ते संबंधित तरुणीला घेऊन सातार्याच्या दिशेने गेले.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या पथकाने संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. रविवारी पहाटे साडेतीन वाजता संशयितांना आनेवाडी टोलनाका, सातारा येथे अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण करत आहेत. अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपास सुरू केला. अवघ्या तीन ते चार तासांमध्ये पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. अपहरण नक्की कशासाठी करण्यात आले, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती झोन 4 चे उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.