स्थैर्य, पुणे, दि.१०: कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या पुणे विभागातील तब्बल 5 हजार 647 घरांची ऑनलाईन पध्दतीने जानेवारीमध्ये बंपर सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ गुरूवार (दि.10) रोजी दुपारी 2.30 वाजता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत करण्यात येणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील,गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही. आर श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
म्हाडा अंतर्गत सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाईन नोंदणी उद्या सायंकाळी 5 वाजता सुरु होईल. याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्हयात म्हाळूंगे (चाकण) येथे 514, तळेगांव दाभाडे येथे 296, सोलापूर जिल्हयात गट नं. 238/1, 239 करमाळा येथे 77 तर सांगली येथे स.क्र.215/3 येथे 74 सदनिका अशा एकूण 961 सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. तर म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण 1079 सदनिका आहेत. तसेच सांगली येथे 129 सदनिका आहेत.
प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्हयात महाळुंगे येथे 1880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्हयात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1980 सदनिका आहेत.
20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 1020 तर कोल्हापूर महानगरपालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत. तरी इच्छूकांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी कळविले आहे.