लातूर शहराबाहेरील नवीन बाह्यवळण मार्गाचे काम आता आशियाई बँक निधीतून करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । मुंबई । लातूर शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बाह्यवळण मार्गा (रिंगरोड) साठीचे भूसंपादन झाले असून या चारपदरी रिंगरोडचे काम आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून करण्यासाठी प्रस्ताव पाठवावे. तसेच लातूर ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासन भरीव निधी देईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातील विविध रस्ते विकास कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) उल्हास देबडवार, सचिव (रस्ते) अनिल गायकवाड, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह लातूरचे अधीक्षक अभियंता ए.डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता दिलीप उकिरडे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

लातूरचे पालकमंत्री श्री. देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच सुधारणांसाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच मागील कामांची थकीत देयके देण्यात यावीत, असे सांगितले. लातूर शहरातून जाणाऱ्या लातूर-नांदेड महामार्गावर शहरात उड्डाणपूल उभारणे, लातूर-पुणे मार्गावरील टेंभूर्णी ते लातूर मार्गाची रुंदीकरण, लातूर शहराभोवतीचे रस्ते मुख्य मार्गाशी जोडणे, लातूर शहराच्या बाजूने रिंगरोड तयार करण्यासाठी निधी मिळणे, ग्रामीण लातूर व रेणापूर मतदारसंघातील रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करणे आदी विविध मागण्या श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या.

श्री.चव्हाण म्हणाले की, लातूरसह मराठवाड्यातील रस्त्यांच्या कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही. तसेच मागील थकीत रक्कम देण्यासाठी प्रयत्न करू. लातूर- नांदेड महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्यांच्याशी संपर्क साधून शहरातून जाणाऱ्या 7 किमी मार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाकडे पाठविण्यात येईल. पुण्याला जाणाऱ्या मार्गावर टेंभूर्णी ते लातूर ह्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही लवकरच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

लातूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या 61 किमीच्या नवीन रिंगरोडच्या कामास मंजूरी देण्यात आली असून 50 किमीचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित 11 किमीमध्ये रस्ता अस्तित्वात आहे. या रिंगरोडचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून तो करण्यात येईल, असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

नाबार्ड अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठीही प्रस्ताव पाठवावे, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!