दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२४ | फलटण |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणान्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र शब्दात निषेध सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाकडून करण्यात आला आहे. निषेधाचे पत्र भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.
निषेध पत्रात म्हटले आहे की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दि. २९ मे रोजी महाड येथे मनुस्मृतीची प्रत फाडत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा फोटो फाडला. हे करून त्यांनी आपण सुद्धा मनुस्मृतीची औलाद आहोत हे महाराष्ट्रातील समस्त दलित बांधव व महाराष्ट्रातील सर्व जनतेला दाखवून दिले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सर्व दलित बांधवांच्या भावना दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने केली आहे.
सध्या चर्चेत असलेला मनुस्मृतीचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकात ठेवण्यात येवू नये अन्यथा संपूर्ण देशभर यासंदर्भात तीव्र आंदोलने करण्यात येतील व त्याच्या परिणामास राज्यशासन जबाबदार राहील, असा इशाराही मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.