दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । फलटण । जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवर खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम जाणवू लागलेले आहेत. जागतिक तापमान वाढीचे परिणाम फलटण तालुक्यामध्ये जाणवू नयेत म्हणून फलटण तालुक्याचा सर्व बाजूंनी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वृक्षसंवर्धन करणे सुध्दा गरजेचे आहे. वृक्षसंवर्धन करण्यासाठी संबंधित गावचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील जावली गावाच्या हद्दीत असणार्या डोंगरांवर सॅटेलाईट रोटरी कल्बच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सॅटेलाईट रोटरी कल्ब, फलटणचे अध्यक्ष श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, सचिव विक्रम निंबाळकर, खजिनदार जगदिश करवा, संचालक डॉ. महेश बर्वे, बाहुबली शहा, प्रा. सुधीर इंगळे, रामदास कदम, तुषार नाईक निंबाळकर, प्रसन्न रूद्रभटे, सचिन भोसले, डॉ. चंद्रकांत जगदाळे, शिवतेज नाईक निंबाळकर, कौस्तुभ गांधी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुक्यामधील सर्वसामान्य नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस वृक्षसंवर्धन करण्यासाठी देणे गरजेचे आहे. ज्यांना थोडा वेळ असतो त्यांनी त्यांचा थोडासा वेळ वृक्षसंवर्धन करण्यासाठी देणे आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम जर कमी करायचे असतील तर आपल्याला वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
बिदाल, ता. माण येथील वनव्यस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांनी बिदाल येथे पाणी फौंडेशन व लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये वृक्षसंवर्धनाचे काम कश्याप्रकारे करता येईल याची माहिती सुद्धा देशमुख यांनी यावेळी दिली.
सॅटेलाईट रोटरी क्लब, फलटणच्या वतीने बिदाल, ता. माण येथील वनव्यस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख व वडगाव, ता. माण येथील बालाजी जगदाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक सॅटेलाईट रोटरी क्लबचे संचालक व गोविंद मिल्क दुग्धविकास विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी केले तर आभार रामदास कदम यांनी मानले.