स्थैर्य, दहिवडी, दि. १० (डॉ विनोद खाडे) : सालाबादप्रमाणे आपल्या कडे सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र कोरोना पार्श्वभूमीवर ज्या प्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात आला, त्याच पद्धतीने शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून सर्वांनी नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन खटाव माण चे नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात,तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील,नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी
व प्रशासन बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष किशोरी पाटील,नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर, नायब तहसिलदार शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख आदींची उपस्थिती होती.
नवरात्र उत्सव संदर्भात राज्य शासनाने दिलेल्या परिपत्रकात सार्वजनिक नवरात्र मंडळांनी आपल्या क्षेत्रातील स्थानिक प्रशासनाची यथोचित पूर्व परवानगी घ्यावी, देवीचे मंडप मर्यादित स्वरूपात असावेत,हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असून त्या अनुषंगाने देवीची मूर्ती असावी,सार्वजनिक मंडळासाठी ४फूट उंचीची तर घरगुती २फूट उंचीची मूर्ती असावी,शक्यतो धातूची मूर्ती असावी,पारंपारिक पध्दतीची मूर्ती विसर्जन करण्याची सोय करावी,लोकांच्या कडून ऐच्छिक वर्गणी स्वीकारावी,सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, विनाकारण गर्दी करणारे मनोरंजन कार्यक्रम न घेता,शासनाच्या आरोग्यविषयक माहिती, शिबिरे घ्यावीत, देवींच्या दर्शनासाठी गर्दी करू नये,सोशल मीडियावर हे चित्रण दाखवावे,मंडपात एकावेळी ५ व्यक्ती असाव्यात, प्रत्येक व्यक्तीस मास्क बंधनकारक आहे, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर करावा, मुर्ती विसर्जन मिरवणुकीस सक्त मनाई आहे,आदी सूचना या वेळी देण्यात आल्या.यावेळी तालुक्यातील अनेक पोलीस पाटील,सरपंच व मंडळातील कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. त्याच प्रमाणे शासनाच्या”माझं कुटुंब माझी जबाबदारी” मोहीमेची ही माहिती मंडळांनी लोकांना द्यावी, आणि “माझं शरीर माझी जबाबदारी”समजून स्वतः बरोबर इतरांना ही कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी या वेळी केले.
उपनगराध्यक्ष किशोरी पाटील,नायब तहसिलदार शिर्के, स पो नी मालोजीराजे देशमुख यांनी ही सर्वाना संबोधित केले.
शासनाच्या सूचनांचे पालन करणाऱ्या ना प्रशासन निश्चितच सहकार्य करणार असल्याचे यावेळी डी वाय एस पी देशमुखांनी सांगितले.बैठकीस तालुक्यातील सुमारे १००हुन अधिक जण उपस्थित होते.