स्थैर्य, सातारा, दि. ८: सातारा येथील ऐतिहासिक सैनिक स्कूलच्या अंतर्गत विकास आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. हा प्रश्न आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हावासियांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने देशसेवेसाठी हजारो सैनिक दिले आहेत. देशात काही निवडक शहरात सैनिक स्कूल आहेत. त्यामध्ये आपल्या सातारा शहराचाही समावेश आहे. सैनिकी शिक्षण देऊन देश रक्षणासाठी शूरवीर, राष्ट्रप्रेमी अधिकारी आणि सैनिक या स्कूल मधून घडवले जातात. या सैनिक स्कूलचा अंतर्गत विकास व्हावा, विध्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक बाबी विकसित व्हाव्यात आणि हे सैनिक स्कूल परिपूर्णतेने सुसज्ज व्हावे यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा सैनिक स्कूलसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वित्त खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. पवार यांनी नेहमीच सातारा जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी दिला आहे. सैनिक स्कूलसाठीही अजितदादांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजितदादा पवार यांच्यासह यासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षणमंत्री ना. गायकवाड आणि पालकमंत्री ना. पाटील यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले आहेत.