खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२३ । मुंबई । “पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. तसेच, खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसेच, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा”, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरु यांची पाऊस आणि पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण हेही या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना पेरणीपूर्व योग्य पीक पाणी सल्ला देणे गरजेचे आहे.  हवामान विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृषी विभागाने यासंदर्भातील सूचना, मार्गदर्शन शेतकऱ्यांना वेळोवेळी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांपासून अगदी गावपातळीवरील विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना पीकपेरणी संदर्भातील माहिती, पावसाला विलंब झाल्यास घ्यावयाची काळजी, विशिष्ट हवामान पद्धतीत कोणते पीक घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शेतकरी हा राज्याचा महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी संकटात येणार नाही, यासाठी आतापासूनच योग्य ती पूर्वतयारी आणि नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

“सध्या राज्याच्या काही भागात पेरणी झाली आहे. जून महिना अखेरीस पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी”, अशा सूचनाही मंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.

“सध्या शेतकरी वर्ग पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यात व्यस्त आहे. अशावेळी त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाने घ्यावी. जिल्हास्तरावरील सनियंत्रण समित्यांनी याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. चुकीचे काम करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री श्री. सत्तार यांनी दिले. बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही संदर्भात राज्यासाठी नवीन कायदा करण्याचा विचार सुरु आहे. देशात इतर राज्यांनी असा कायदा केला असेल तर त्याचाही निश्चितपणे अभ्यास करुन आपल्या राज्याचा कायदा अधिक कडक असेल”, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे धागेदोरे शोधून संबंधितांवर कडक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. अनुपकुमार, कृषी आयुक्त श्री. चव्हाण, विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनीही त्यांचे म्हणणे मांडले.


Back to top button
Don`t copy text!