वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२३ | फलटण | टाळ मृदुंगाच्या गजराच आळंदीहून विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा आज, दि. २१ जून रोजी सायंकाळी ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. माऊलींचा पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीमंत संजीवराजेंनी माउलींना साकडे घातले.

विठ्ठल दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…ग्यानबा तुकाराम’ सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुरकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा आज दि. २१ जून रोजी महानुभाव व जैन पंथीयांची काशी समजल्या जाणार्‍या ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी विसावला. दरम्यान उद्या हा पालखी सोहळा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाकरीता बरड येथे विसावणार आहे.

तरडगाव येथून प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत संध्याकाळी 5 वाजता फलटण शहरात दाखल झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे शहराच्या प्रवेशद्वारावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड, पोलीस उपअधिक्षक राहुल धस, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी तथा पालखी सोहळ्याचे नोडल अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार अभिजित जाधव आदी मान्यवरांनी स्वागत केले.

माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सद्गुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी माऊलींच्या पादुकांना पुष्पहार घालून दर्शन घेतलेे. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी विसावला. वारीत चालणार्‍या लाखो वारकर्‍यांपासुन शहर व तालुक्यातील गावकर्‍यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरती नंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणकरांनी मोठ्या रांगा लावल्या.

यावर्षी अजूनही पाऊस दाखल न झाल्याने वारकरी शेतकऱ्यांना इच्छा असून सुद्धा वारीमध्ये सहभागी होता आले नाही; त्यामुळे या वर्षी वारकऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कमी असल्याचे भासत होते. आज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण होते.

पालखी सोहळ्राचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकर्‍यांचे सकाळपासुनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जरघोष व भगव्रा पताका यामुळे अवघे शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकाणी मोफत चहा, सरबत, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय वारकर्‍यांसाठी करण्यात आली होती. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते.

दरम्यान वारकर्‍यांना अडचणी येवु नयेत या करीता नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे आंघोळ व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली. वारकर्‍यांसाठी पिण्यास पाणी टँकरद्वारे पुरविण्यात आले. पालखी तळावर तात्पुरत्या स्वरुपात शौचालये व स्वच्छता गृहे उभारण्यात आली होती. पुरवठा विभागाच्या वतीने पालखी तळावर गँस सिलेंडर व रॉकेल उपलब्ध करुन देण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात येत होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची व्यवस्था केली होती. वारकर्‍यांच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखी तळावर नगर पालीकेच्या वतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आला होता.

शहरातील वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शहराच्या बाहेर बस थांब्यांचे नियोजन केले होते. त्यानुसर गोंदवले, शिंगणापूर कडे जाणार्‍या एस.टी. बसेस कोळकी येथून, आसू, गुणवरे कडे जाणार्‍या एस.टी. बसेस गोविंद डेअरीसमोर, बारामतीकडे जाणार्‍या एस.टी. बसेस सोमवार पेठ येथून तर सातारा, पुणे कडे जाणार्‍या एस.टी. बसेस मुधोजी महाविद्यालय परिसरातून रवाना केल्या जात होत्या.

उद्या दि. २२ जून रोजी फलटण येथून सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचा प्रस्थान झाला. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंपरद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवुन हा सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी विसावणार आहे.


Back to top button
Don`t copy text!