स्थैर्य, मुंबई, दि.१९: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी 500 कोटींचा निधी द्या, अशी मागणी या महामंडळा चे माजी अध्यक्ष व भाजपा नेते अमित गोरखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.
श्री. गोरखे यांनी सांगितले की अनुसूचित जातीतील मातंग समाज व इतर पोट जातीतील समाजासाठी अस्तित्वात आलेले महामंडळ आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार मध्ये झालेल्या मोठया भ्रष्टाचारामुळे हे महामंडळ आजतागायत सावरू शकलेले नाही.
अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात उपरोक्त महामंडळाला 100 कोटी रू. देण्याची घोषणा केली. मात्र हा निधी अत्यंत अपुरा आहे. भागभांडवल निधी संपुष्टात आल्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये महामंडळाच्या हिश्श्याची रक्कम (महामंडळाचा सहभाग निधी) बँकांकडून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांमध्ये कर्ज व अनुदान वितरण करता येत नाही.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ मर्या. नवी दिल्ली (एन.एस.एफ.डी.सी.) यांचेकडून घेतलेल्या कर्जापोटी रक्कम रू.94.00कोटी या महामंडळाकडे थकीत असून, मागील 10 वर्षापासून त्यांचेकडून या महामंडळास वित्त पुरवठा करणे बंद आहे.त्यामुळे या महामंडळासाठी 500 कोटींचा निधी राज्य शासनाने द्यावा.एवढा निधी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही श्री. गोरखे यांनी दिला.