शाळांमधून कोविड मार्गदर्शक सूचनांची माहिती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । पुणे । कोविड संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोविड मार्गदर्शक सूचना आणि त्या अनुरूप वर्तणुकीची माहिती देण्यात यावी, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांना सूचना द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना मास्क घालणे, शारिरीक अंतराचे पालन करणे आणि कोविड संसर्गापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत सातत्याने माहिती देण्यात यावी. वर्गातील बैठक व्यवस्थेतही शारिरीक अंतराचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. येत्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांकडूनदेखील मास्कचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त लसीकरण मोहीम

‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून 30 सप्टेंबरपासून सलग 75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत सर्व लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातदेखील अशाच पद्धतीने 75 तासांची ‍विशेष लसीकरण मोहीम घेण्यात यावी. जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी 6 तालुक्यात 75 तास आणि उर्वरीत 7 तालुक्यात 75 तासात सलग लसीकरण घेण्यात यावे. लोकप्रतिनिधींनीदेखील लसीकरण मोहिमेत उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

नॉन कोविड रुग्णांवर उपचाराची व्यवस्था

जिल्ह्यात कमी होणारी कोविड बाधितांची संख्या लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात इतर आजारांच्या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची सुविधा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. ग्रामीण भागात एक रुग्णालय स्वतंत्र कोविड बाधितांसाठी आणि दुसरे रुग्णालय इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात आणावे. एकच रुग्णालय असलेल्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिचारिकांची नियुक्ती करतांना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही श्री. पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉल

उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयाने मिळालेल्या सीएसआरच्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स आणि रुग्णालयांसाठी कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉल आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टर्स आणि परिचारिकांना दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. हा प्रोटोकॉल जम्मू आणि काश्मिर राज्यदेखील वापरणार आहे. इतर 9 राज्यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांच्या स्तरावर त्याचा अभ्यास सुरू आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला त्याची लिंक उपलब्ध करता येईल, अशी माहिती श्री.पवार यांनी यावेळी दिली.

सिरींजसाठी निधीची उपलब्धता

सीएसआरच्या माध्यमातून मिळालेल्या लसमात्रांसाठी सिरींजची कमतरता भासत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने 1 लाख सिरींजची खरेदी केली. पुणे महापालिकेनेदेखील अशाचप्रकारे आवश्यकतेनुसार सिरींज उपलब्ध करून घ्यावे. ग्रामीण भागातील लसीकरणासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. लसीकरणाचा वेग कायम राहील आणि पहिल्या लसमात्रेप्रमाणे नागरिकांना दुसरी लसमात्रा घेतील यासाठी विशेष प्रयत्न करावे असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणामुळे कोविड संसर्ग नियंत्रणात येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या असल्या तरी मास्कचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीत लोकप्रतिनिधी आणि कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी जिल्ह्यात कोविड संसर्ग कमी होत असल्याबाबत समाधान व्यक्त करताना काही सूचना केल्या.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची कोरोना परिस्थितीची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात 1 कोटी 5 लाख लसीकरण झाले असून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून 5 लाख लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात उच्चांकी 24 लाख 37 हजार 141 लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात 85 टक्के लोकांनी पहिला डोस, तर 47 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. मागील 15 दिवसांमध्ये बाधित रुग्णांमध्ये 30 टक्के व क्रियाशील रुग्णांमध्ये 19 टक्के घट दिसून आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा प्रमाण आतापर्यंत सर्वात जास्त 98 टक्के तर मृत्यू दर 1.6 टक्के आहे.

बैठकीत आमदार ॲड. अशोक पवार, भीमराव तापकीर, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहूल कुल, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, विशेष पोलिस महानिरिक्षक कोल्हापूर मनोज लोहिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदा उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!