दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सुविधा म्हणजेच पिण्याचे पाणी, टॉयलेट्स, स्वच्छतागृहांची स्वच्छता, प्रथमोपचार यंत्रणा, सुरळीत विद्युत पुरवठा, आवश्यक असणाऱ्या मतदारांना रिक्षा, व्हील चेअर उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांची संयुक्तिक बैठक मध्यवर्ती निवडणूक कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील असणाऱ्या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आल्यानंतर उपलब्ध असलेल्या सुविधा या मिळाल्या पाहिजेत. यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांनी काटेकोर नियम पाळून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सुद्धा स्पष्ट केले.