स्थैर्य, सातारा दि.२: उत्तर प्रदेशतील हाथरस मध्ये घडलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांची अमानुष भूमिका, तसेच बलरामपूर येथील घटनेच्या बाबत व यूपी सरकारच्या असंवेदशील भूमिकेचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज निदर्शने करण्यात आली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, विद्रोही विद्यार्थी संघटना व पुरोगामी संघटनांचे वतीने हि निदर्शने आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अत्याचारग्रस्त तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे , आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी , उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्यात यावेव तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी साथी विजय मांडके, साथी मिनाज सय्यद, प्रा. डॉ विजय माने, अॅड राजेंद्र गलांडे, प्रा. डॉ मनिषा शिरोडकर, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, शैला यादव, अमित कांबळे, रश्मी लोटेकर, अॅड. पायल गाडे, महेश गुरव , रोहित क्षीरसागर, शुभम ढाले, संकेत माने इ. कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आले.