
दैनिक स्थैर्य | दि. 21 एप्रिल 2025 | फलटण | विलेपार्ले, मुंबई येथील सुमारे २६ वर्षांपूर्वी उभारलेले श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही संधी न देता किंवा त्यांचे मत विचारात न घेता जमीन दोस्त केल्याच्या निषेधार्त येथील जैन समाजाच्यावतीने मोर्चा द्वारे प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन या घटनेचा तीव्र निषेध करणारे निवेदन दिले आहे.
मुंबई येथे जैन समाजाने या घटनेचा तीव्र निषेध प्रचंड मोर्चाद्वारे केला असून त्या पार्श्वभूमीवर फलटण जैन समाजाच्यावतीने आज (सोमवारी) श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून निघालेला प्रचंड मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरुन अधिकार गृह इमारतीपाशी पोहोचल्यानंतर तेथे छोटे खानी सभेत आ. सचिन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, भाजप अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, मंदिर महासंघाचे खंदारे, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, डॉ. जे. टी. पोळ वगेरेंची या घटनेचा निषेध करणारी भाषणे झाली.
सदर घटना निंदनीय असून आपण या घटनेचा निषेध करतो असे सांगत आपण मुंबईत गेल्यावर आपले नेते, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर आपल्या भावना घालुन संबंधीत अधिकाऱ्यांच्या या कृत्याची माहिती घेऊन त्यांचेविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीन याची ग्वाही यावेळी आ. सचिन पाटील यांनी दिली.
या घटनेची सखोल चौकशी करुन दोशी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी, शासनाने सदर मंदिर पुन्हा बांधून द्यावे, जैन साधू – साध्वीजी महाराज सतत पायी प्रवास करतात त्या दरम्यान त्यांना वाटेत नाहक त्रास दिला जातो, अंगावर वाहने घातली जातात, त्यामध्ये काही साधू – साध्वीजी महाराज गंभीर जखमी झाले आहेत, काहींचा मृत्यू ओढवला आहे, त्यासाठी प्रवास दरम्यान त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी अनुप शहा यांनी आ. सचिन पाटील यांच्याकडे केली.
जैन समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्च्यात जैन समाजातील स्त्री – पुरुष, तरुण वर्ग भर उन्हात मोठ्या संख्येने सहभागी होता, शहरातील प्रमुख मार्गावरुन जाताना अत्यंत शांततेत व शिस्तीने जाताना मोर्चेकऱ्यांनी हातात घेतलेल्या फलकांद्वारे आपल्या निषेधाच्या भावना व्यक्त केल्या.
सदर निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी स्वीकारले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. सचिन पाटील, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना पाठविण्यात आल्या आहेत.