फलटण येथे कायमस्वरूपी पालखी तळ उभारण्याचा प्रस्ताव ; आळंदी देवस्थान कमिटीने केली जागांची पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२४ | फलटण |
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मार्ग, पालखी तळ, विसाव्याची ठिकाणे यांची प्रत्यक्ष पाहणी आणि सोहळ्याच्या वाटचालीदरम्यान आरोग्य, स्वच्छता, पाणी, सुरक्षा आदी बाबींची माहिती घेतल्यानंतर आळंदी देवस्थान कमिटीने समाधान व्यक्त केले असून काही सूचना संबंधित शासकीय यंत्रणांना केल्या आहेत.

आषाढी वारीसाठी आगामी जून महिन्यात आळंदीहून पंढरपूरकडे जाणार्‍या संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आळंदी देवस्थान कमिटीच्यावतीने पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी केलेल्या पाहणी दौर्‍यात फलटण येथे स्थानिक पत्रकारांशी बोलताना प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे.

पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून आगामी २ महिन्यात जवळपास ९० टक्के पर्यंत सदर काम पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करताना विविध ठिकाणच्या पालखी तळांपैकी अनेक ठिकाणी किरकोळ दुरूस्त्यांची अपेक्षित कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरित होतील याची ग्वाही संबंधित यंत्रणांनी दिली असल्याचे तसेच स्वच्छता व आरोग्य विषयक, पाणी पुरवठा, सुरक्षा वगैरे बाबींची व्यवस्था नेहमीप्रमाणे करण्याचे आश्वासन महसूल, पोलिस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणांनी दिले असून त्याची पूर्तता होईल, असा विश्वास प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केला आहे.

सर्व ठिकाणी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांचे अधिकारी भेटत असून सर्व शासकीय यंत्रणांची कामे वेळेत पूर्ण होतील, अशी आशा विश्वतांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, फलटण येथे पालखी तळासाठी शासन कायमस्वरूपी जागा खरेदी करून तेथे पालखी तळ उभारण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आल्यानंतर येथील पत्रकारांनी नीरा उजवा कालव्यालगत असलेली श्रीराम कारखान्याने विक्री केलेली जमीन विकत घेऊन तेथे पालखी तळ उभारण्याचा आणि दुसरा साई मंदिर समोरील एका ट्रस्टच्या जागेचा प्रस्ताव असे दोन प्रस्ताव लक्षात घेऊन आळंदी देवस्थान विश्वस्त समिती, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी प्रस्तावित दोन्ही जागांची पाहणी केली.

प्रशासनाने साई मंदिरासमोरील एका ट्रस्टच्या जागेचा प्रस्ताव दिला आहे, तर शहर व तालुक्यातील पत्रकार यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याने विक्री केलेल्या जागेचा प्रस्ताव दिला आहे.

देवस्थान कमिटीने दोन्ही जागांची पाहणी केली असून श्रीराम कारखान्यालगतच्या जागेस प्रथम पसंती दर्शविली आहे. सदर जागा शहरालगत असूनही शहराच्या व्यवस्थेवर, वाहतूक व अन्य कोणत्याही सुविधेवर ताण येणार नाही, लगत नीरा उजवा कालवा असल्याने पाण्याची मुबलक व्यवस्था होऊ शकते, माऊली या तळावर लोणंद (दक्षिण) बाजूने प्रवेश करू शकतील आणि उत्तर बाजूने थेट पालखी महामार्गावर निघणार असल्याने अत्यंत सोईचा, प्रशस्त, पाण्याची सुविधा असलेला उत्तम पालखी तळ होईल आणि वर्षभर उत्तम क्रीडांगण म्हणून त्याचा वापर होऊ शकेल, ही बाब विश्वस्त मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

श्रीराम कारखाना येथील प्रस्तावित जागेची पाहणी करताना आळंदी देवस्थान कमिटी, शासकीय अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्यासह अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!