दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । फलटण । पर्यावरण संरक्षण आणि संतुलन यासाठी विविध शासकीय योजना प्रभावीरितीने राबविण्यासाठी फलटण नगर परिषद प्रयत्नशील असून त्यामध्ये शहरवासीयांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मालमत्ता करातील सवलतींची घोषणा नगर परिषद प्रशासनाने केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.
पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था (Rain Water Harvesting), घरातील कचऱ्यापासून कृमी (कंपोस्ट) मिश्रखत तयार करणे (Home Composting), सौरऊर्जा वापराद्वारे पाणी गरम करणे आणि घरगुती वीज वापर (Solar Roof Top System above 1 kw), पवन उर्जा वापर (Wind Mill above 1 kw) वगैरे पर्यावरण पूरक यंत्रणा वापरणाऱ्या शहरातील मिळकतींना सन २०२२ – २०२३ चे मिळकत करामध्ये १ टक्का सूट देण्याची घोषणा करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे राज्य शासन नगर विकास विभागाकडील शासन निर्णयानुसार इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरी संस्थांमधील नागरिकांना/गृहनिर्माण संस्थांना वैयक्तिक घरांसाठी व इतर नागरिकांना सिंगल फेज चार्जिंग स्टेशनसाठी त्यांच्या मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येणार आहे, तसेच गृहनिर्माण संस्थेने उभारलेल्या चार्जिंग स्टेशनसाठी ५ टक्के सूट महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण २०२१ लागू असेपर्यंत देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
याबाबत नागरिकांना अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असल्यास नगर परिषद कार्यालयात कर निर्धारक श्रीमती बडदरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.