दैनिक स्थैर्य | दि. १३ जून २०२४ | फलटण |
गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटणमार्गे पंढरपूरला जात असतो; परंतु प्रत्येक वेळी नियोजनामध्ये त्रुटी राहून जातात. त्यामुळे यावर्षी प्रशासनातर्फे आगामी पालखी सोहळा व त्यामधील सर्व भाविकांच्या व फलटणमधील नागरिकांच्या आरोग्याचे व स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्तेडॉ. महेशकुमार खरात व डॉ. कांचनकन्होजा खरात यांनी फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांना दिले आहे.
निवेदनात खरात यांनी फलटणमधील पालखी मार्गावरील खड्डे, नागरिकांसाठी सुलभ शौचालये, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, पालखीतील भाविकांच्या आरोग्याची तपासणी व उपचारासाठी डॉक्टरांचे पथक इ.बाबतचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे.
वरील सर्व बाबींची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही डॉ. महेशकुमार खरात व अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी केली आहे.