स्थैर्य, फलटण : कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी फलटण नगरपरिषदेच्या वतीने शहरभरातुन गणेश मूर्तींचे एकत्रित संकलन करून त्यांचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच शहरात मुख्य ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सदर ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
सध्या फलटण शहरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्या मुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग फैलावु नये या करिता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकारण गर्दी न करता आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. शहरात फिरताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. शहरातील व्यापारी व नागरिक यांनी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. १० वर्षे वयोगटाच्या आतील मुलांनी व ६० वर्षे वयोगटाच्या वरील जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनावेळी गर्दी टाळण्याकरिता फलटण नगरपरिषेदेच्या वतीने घरोघरी फिरून ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे गणेश मूर्तींचे एकत्रित संकलन करण्यात येऊन त्यांचे विधिवत विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच फलटण शहरामध्ये गणेश मूर्तींचे संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. सदर संकलन केंद्रे श्रीराम मंदिर जवळील श्रीराम पोलीस चौकी समोर, उंब्रेश्वर चौक मलठण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने डी. एड. कॉलेज चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, गजानन चौक या प्रमाणे असणार आहेत. तसेच घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक भवन, यशवंतराव चव्हाण हायस्कुल, स्वामी विवेकानंद नगर येथील कासार बावडी या ठिकाणी कृत्रिम तळ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर कृत्रिम तळ्यावर गणेश भक्तांना पाच व सात दिवसांच्या गणपतीचे सुद्धा विसर्जन करता येणार आहे. मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा जिंती नाका येथील पुलावरही विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच पंढरपूर पूल येथे गणेश मूर्ती विसर्जनाकरिता क्रेनची विशेष सोय करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत फलटण नागरपरिषेदेच्या वतीने फलटण शहरात फिरून ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे व संकलन केंद्रावर गणेश मूर्तींचे संकलन करण्यात येणार असून कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी फलटण नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.