दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | पंढरपूर | पंढरपूर आषाढीवारी यात्रा कालावधीत अनधिकृत खाद्य पदार्थ, उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ आदि खाद्य पदार्थ व वस्तुंची आवक किंवा विक्री करण्यास तसेच परिसर अस्वच्छ होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल अशा सर्व कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ४३(१) अन्वये अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
आदेशात म्हटले आहे, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे यावर्षी दि.२०.०६.२०२३ ते दि.०४.०७.२०२३ या कालावधीत आषाढीवारी यात्रा भरत आहे. पंढरपूर शहरात येत्या आषाढीवारी २०२३ यात्रेच्या वेळी कोणत्याही रोगाची साथ उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे व त्याचा उद्भव होवू नये म्हणून विशेष प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे जरुरीचे आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीत दि.२०.०६.२०२३ ते दि.०४.०७.२०२३ (दोन्ही दिवस धरुन) पर्यंत अनधिकृत खाद्य पदार्थ, उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ, पेये, कच्ची फळे, जादा पिकलेली फळे, कुजलेली किंवा निरूपयोगी फळे, आंबे, कलिंगडे, टरबुजे, केळी वगैरे ज्या वस्तुंवर किंवा माशा घिरट्या घालतात असे खाद्य पदार्थ व वस्तुंची आवक किंवा विक्री करण्यास तसेच परिसर अस्वच्छ होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल अशा सर्व कृत्यांवर बंदी घालीत आहे. सदर आदेशाचा भंग केलेस संबंधिताविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३९ अन्वये कारवाई करण्यात येईल.