दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । संस्कृत,प्राकृत, अशा भाषांचे महत्व कमी असण्याच्या काळात’ शिक्षण घेऊन याच कॉलेजमध्ये ३३ वर्षे संस्कृत विभागात काम करून प्रा.डॉ.पोर्णिमा मोटे यांनी संस्कृत भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. विद्यार्थी म्हणून शिक्षण घेऊन याच कॉलेजमध्ये प्राध्यापक, संस्कृत विभाग प्रमुख म्हणून काम करणे हे खूप मोठे भाग्य आहे.नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत भाषेला महत्व देण्यात आलेले असल्याने पुढच्या काळात संस्कृत भाषेला महत्व प्राप्त होईल ‘’ असे विचार रयत शिक्षण संस्थेचे सचिव छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी व्यक्त केले.ते छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मिनीसभागृहात स्टाफ वेलफेअर विभागाने आयोजित केलेल्या ‘प्रा.डॉ.पोर्णिमा मोटे सेवानिवृत्ती सदिच्छा व गौरव समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते .यावेळी स्टाफ वेलफेअर विभाग प्रमुख डॉ.शिवाजी पाटील,प्रबंधक डॉ.अरुणकुमार सकटे.अधीक्षक तानाजी सपकाळ,सर्व विभागांचे प्रमुख ,डॉ.संदीप किर्दत इत्यादी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक करताना स्टाफ वेलफेअर डॉ.शिवाजी पाटील यांनी प्रा.डॉ.पोर्णिमा मोटे यांच्या शैक्षणिक ,सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. ते म्हणाले ’’ त्यांचे पूर्वीचे नाव मीना शरदराव चव्हाण. त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये १९८२ ला बी.ए. ब १९८४ ला एम.ए .संस्कृत विषयात केले. १९८६ ला बी.एड.तर १९८७ ला एम.एड.पदवी संपादन केली. त्यांनी ‘याज्ञवल्क्य स्मृतीतील स्त्री विषयक विचारांची चिकित्सा या विषयावर प्रा.डॉ.सुहासिनी राजेभोसले यांचे मार्गदर्शनाने एम.फिल पदवी मिळविली.तसेच प्रसिद्ध विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी ‘भास ,कालिदास आणि भवभूती यांचा स्त्री विषयक दृष्टीकोन‘या विषयावर पीएच.डी.पदवी संपादन केली. १९८८ सालापासून ते ३० सप्टेंबर २०२२ या काळात त्यांची छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये संस्कृतच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम केले. उच्च विद्याविभूषित परिवारात झालेल्या संस्काराने त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविले. अमेरिकेत टेक्सास येथे त्यांचा थोरला मुलगा अनिकेत हा एरोस्पेस इंजिनियरिंग मध्ये पीएच.डी करीत आहे.तर दुसरा चिनार हा मुलगा इंजिनियरिंग करून पुण्यात नामवंत कंपनीत काम करीत आहे. माहेर आणि सासरचे पाठबळ घेऊन जसे त्यांनी शिक्षण घेतले तसेच मुलांना मोठे केले. संस्कृत विषयाचे अनेक विद्यार्थी विद्यापिठात प्रथम आले असून सुवर्ण पारितोषिके व राज्यपाल यांचे हस्ते त्यांनी स्वीकारली आहेत.’’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर व उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख यांनी प्रा.डॉ.पोर्णिमा मोटे व श्री.चंद्रकांत मोटे यांचा चांदीचे नाणे,सन्मान चिन्ह,पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार केला. सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारास उत्तर देताना प्रा.डॉ.मोटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन करीत आपले आत्मकथन व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी सदस्य म्हणून यापुढेही छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कार्यात योगदान देत राहीन असे अभिवचनही त्यांनी दिले. सेवानिवृत्तीनिमित्त कॉलेजसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्याकडे दिला. समारंभात चिनार मोटे, पायल शेळके,इत्यादिकांनी आपली सदिच्छा मनोगते व्यक्त केली. सूत्र संचालन डॉ.संदीप किर्दत यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख यांनी मानले.