प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न


प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात संस्थापक बॅरिस्टर राजा भोंसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात नुकताच (दि. २८ मार्च) क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे संस्थापक बॅरिस्टर राजा भोंसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. नितीन भैय्या भोंसले हे उपस्थित होते, तर संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. शंतनू भोंसले यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

‘संघभावना आणि स्पर्धात्मकता निर्माण करणे हाच हेतू’

या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री. रणजित शेळके यांनी स्पर्धांमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये संघभावना आणि स्पर्धात्मकता निर्माण करणे, हा या क्रीडा स्पर्धांमागचा मूळ हेतू आहे.”

‘खेळाडूवृत्ती जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी महत्त्वाची’

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम म्हणाले, “शिक्षणासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. खेळाडूवृत्ती ही केवळ मैदानावरच नाही, तर जीवनातील विविध आव्हाने पेलण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.”

याप्रसंगी विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी प्रा. मोरे सर यांनी आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कु. जिया इनामदार व श्री. रणजित शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. शितल सोनवणे यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या पारितोषिक वितरण सोहळ्याला विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!