दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषद हद्दीतील सि. स. नं. ६४६४ मधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथील झालेले अंतर्गत व बाहेरील बांधकाम व इतर काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामाची देयके संबंधित ठेकेदारास आदा करण्यात येऊ नयेत व या ठेेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
निकृष्ट काम करणार्या संबंधित कामाची देयके आजपासून आदा करण्यात येवू नयेत, अन्यथा ती गंभीर स्वरूपाची वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांना काळया यादीत टाकण्यात यावे, असेही मोरे यांनी म्हटले आहे.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या संबंधित आवारात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य आहे. तरीसुध्दा बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये? असे न केल्यास आपण भ्रष्टाचारास खतपाणी व पाठिंबा देत आहात, असे समजण्यात येईल, असेही मोरे यांनी अर्जात म्हटले आहे.