प्रियदर्शनी दत्तक योजनेमुळे विद्यार्थांना दर्जेदार साहित्य उपलब्ध : युवराज पवार


दैनिक स्थैर्य । दि. 06 जुलै 2025 । फलटण । येथील सदगुरु शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन सुरु करण्यात आलेल्या प्रियदर्शनी दत्तक योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थांना सुध्दा दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्द होत असल्याचे मत पत्रकार युवराज पवार यांनी व्यक्त केले आहे.

फलटण येथील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेमध्ये प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूल बॅग वह्या इत्यादी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार युवराज पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले उपस्थित होते.

प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत राबवले जाणारे उपक्रम निश्चितच स्तुत्य असून इतरांना प्रेरणादायी ठरतील असे आहेत. आपले ही सहकार्य या योजनेसाठी निश्चित राहील अशी ग्वाही यावेळी पत्रकार युवराज पवार यांनी दिली.

प्रियदर्शनी दत्तक योजने अंतर्गत गरजु व गुणवंत सुमारे 100 मुलींना दरवर्षी शालोपयोगी साहित्य, गणवेश तसेच मेडिकल उपचार व मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर शिवम प्रतिष्ठान घारेवाडी अंतर्गत जे उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमाचाही लाभ या मुलींना दिला जातो, असे मत माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांचे आभार मानले.

सौ. रुपाली सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश पाठक, शिक्षक, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!