स्थैर्य, मुंबई, दि.२३: कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी उपनगरीय
रेल्वे सेवा सुरू आहे. यातच दोन दिवसांपूर्वी महिलांना रेल्वेतून प्रवासाची
परवानगी दिल्यानंतर आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही रेल्वे प्रवासाची मुभा
देण्यात आली आहे. रेल्वेने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठविले आहे.
यामध्ये गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी
देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील खासगी सेवेत असणा-या सुरक्षा
रक्षकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या
सात महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेले उपनगरीय रेल्वेचे
दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता आहे. लोकल सेवेसंदर्भात बुधवारी राज्य सरकार
आणि रेल्वे अधिकारी तसेच विविध संघटनांमध्ये बैठक झाली. या संयुक्त बैठकीत
कोणत्या संघटनेत किती कर्मचारी आहेत, रेल्वेत सध्या किती कर्मचारी काम
करतात, याचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय
वडेट्टीवार, राज्य सरकारचे अधिकारी, रेल्वे अधिकारी आणि विविध संघटनांचे
प्रमुख उपस्थित होते.