आर्थिक टंचाईमुळेच लाडकी बहीण योजना बंद – पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | सातारा |
राज्यात सत्ताधार्‍यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे आणि सत्ताधारी निवडणूक आयोगाने सांगितले म्हणून ही योजना बंद केल्याचे खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी कडवट टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. येथील काँग्रेस भवन मध्ये चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आणि सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले, आज लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत. ही योजना मुळात धादांत खोटी आहे. ही योजना आर्थिक टंचाईमुळे म्हणजे तिजोरीत पैसे शिल्लक नसल्यामुळे बंद करण्यात आली आहे. मात्र आता राज्य सरकार निवडणूक आयोगाचे कारण देऊन ही योजना बंद झाल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना का फसवलं, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी टीका चव्हाण यांनी केली. आज सायंकाळी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होत असून यामध्ये आम्हाला पुरेशा जागा मिळाल्या आहेत. जागा वाटपाचे निर्णय सुरू आहेत. दोन दिवसानंतर काँग्रेस उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत. त्याकरिता दोन निरीक्षक महाराष्ट्रात मुक्काम करून आहेत, असेही ते म्हणाले.

कराड दक्षिण सह सातारा जिल्ह्यात कोणत्या जागेची मागणी केली, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक मौन बाळगले. ते पुढे म्हणाले, आजची लढाई विचारधारेची आहे. पैशाचा अतोनात वापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र लोकांना आपलं हित कशात आहे हे चांगले कळते. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार आहे. काँग्रेस पक्ष जो वचननामा काढतो त्यानुसार तो कामे करतो. कर्नाटक व तेलंगणा राज्यात आम्ही जी वचने दिली होती, ती कामे करण्याचा विद्यमान सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर त्यांच्या मागे पुन्हा ईडीची चौकशी लावली जाईल, या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ईडी ही यंत्रणा भ्रष्टाचारी सत्तेसाठी वापरली जाते. मात्र सत्तेच्या बळावर केंद्र सरकार या यंत्रणेचा वापर करत आहे. अलीकडच्या काळात राजकीय मंडळींना हा कायदा वापरून तुरुंगात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. आम्ही फक्त पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. पण आता ईडीची सक्तीची कारवाई आम्ही चालू देणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!