
स्थैर्य, पुणे, दि. 28 : येरवडा तुरुंगातून पॅरोलवर सुटका झालेल्या कैद्याचा पंधरा ते सोळा जणांच्या टोळक्यानं कोयत्यानं वार करून खून केला. काल, बुधवारी रात्री उशिरा येरवडा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
येरवडा येथील नितीन कसबे (वय २४) असं हत्या झालेल्या कैद्याचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचं कळतं. तो एका प्रकरणात तुरुंगात होता. येरवडा तुरुंगातून काल त्याची पॅरोलवर सुटका झाली होती. रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास येरवड्यातील शादलबाबा चौक रस्त्यावर पंधरा ते सोळा जण दबा धरून बसले होते. नितीन त्या ठिकाणी आल्यावर या सर्वांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर सर्व हल्लेखोर तेथून पसार झाले. या हल्ल्यात नितीनचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागेश कांबळे याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्रभरात परिसर पिंजून काढला. मारेकऱ्यांपैकी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलं. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.