
सातारा – क्युआर कोडचे लोकार्पण करताना ना. शंभूराज देसाई, त्यावेळी ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, आ. मनोज घोरपडे व इतर.
स्थैर्य, सातारा, दि. 19 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करण्यावर प्राधान्याने भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. शेतकर्यांच्या हितासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पाणंद रस्ते खुले करावीत यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे तेव्हापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा संपूर्ण राज्यामध्ये राबवला जात आहे. या पंधरवड्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात शुभारंभ झाला. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पालीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षके अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भरगुडे पाटील, , सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रस्ता धान्य दुकानदार , पोलीस पाटील, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अत्यंत चांगल्या सुरु आहे. जिल्हा प्रशासन या अंतर्गत अनेक चांगले उपक्रम राबवित आहे. ते अधिक चांगले व्यापक, सामाजिभूमिक करण्यासाठी यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा, असे सांगून पाणंद रस्ते खुले करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने फिल्डवर जावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले. यावेळी ते म्हणाले, लोकाभिमुख काम करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. समाजाला उपयोगी पडणारे कृती कार्यक्रम सेवा पंधरवडा अभियानांतर्गत राबविण्यामागची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. वेगवेगळ्या विभागांचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम सुरु आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राज्यातील साडेसात युवक युवतींना पर्यटनाशी संबंधित सर्व बाबींचे अद्यावत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या 35 ठिकाणी जागा आहेत. या जागा आणि अन्य काही जागा अशा मिळून एकूण 75 ठिकाणी नमो बहुउद्देशीय पर्यटन सुविधा संकुल उभी करण्यात येणार आहेत. या पैकी चार ठिकाणी युनिस्कोन जाहीर केल्या रायगड, प्रतापगड, शिवनेरी मराठवाड्यातील साल्हेर या किल्ल्याच्या पायथ्याशी ही सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी वृद्ध, महिला, बालक, दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ग्रंथालय, एमटीडीसीच्या सर्व पर्यटन क्षेत्रांची माहिती दर्शविण्यात येणार आहे. दिशा दर्शक नाविन्यपूर्ण उपक्रमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, प्रतापगड संवर्धन यासह विविध ठिकाणांच्या एकात्मिक पर्यटन विकासाठी भरगोस निधी देण्यात येत असल्याचे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दि. 2 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून राज्यात सगळीकडे साजरा केला जात आहे. या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून हे राज्यभर अभियान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दहा-बारा महिन्याच्या कालावधीमध्ये पुरोगामी विचाराचे व लोक हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आपल्या जिल्ह्यात ही या सर्व निर्णयानुसार आपण लोकांना प्रभावीपणे लाभ देत आहोत. यामध्ये प्राधान्याने महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शेतीला जाणारे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर खुले करणे आणि त्यांना क्रमांक देऊन ते कायम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, हे काम अत्यंत महत्त्वाचे असून याचा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांना सर्व स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी सकारात्मक साथ दिली पाहिजे.
हैदराबाद गॅझेटवर आधारित जो नवीन जीआर निघाला त्यानुसार पुरावे तपासून पात्र असणार्यांना दाखले देण्याची सुरुवात मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू झाले आहे, असे सांगून मंत्री श्री. भोसले म्हणाले, आपल्या जिल्ह्यातही सेवा पंधरावडा अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले देण्याचे काम सुरू आहे. घरकुल आवास योजनांना गती देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशांना जागा घेण्यासाठी अनुदान देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. घरकुलांसाठी राज्याला खूप मोठे उद्दिष्ट मिळाले आहे. याचा लाभ घर नसणार्या प्रत्येकाला झाला पाहिजे. सातारा शहरातील वैदू आणि कोल्हाटी वस्तीच्या घरांबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी लक्ष घालावे. वर्षानुवर्ष या समाजातील नागरिक या ठिकाणी राहत आहेत तथापि आजही त्यांच्या नावावर घरे नाहीत. यामध्ये असणार्या तांत्रिक अडचण दूर करून उपेक्षित समाजाला न्याय देऊ. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यामध्ये हा अभियानाचा कार्यक्रम सुरू आहे. सातार्यामध्येही 17 तारखेपासून प्रत्यक्ष फिल्डवर कामकाज सुरू आहे. यामध्ये शेतकर्यांसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते किंवा शेतात जाणारे रस्ते मोकळे करणे आणि रस्त्याला क्रमांक देणे यावर भर आहे. पाणंद रस्त्यांना आत्तापर्यंत ओळख कोणताही क्रमांक दिलेला नव्हता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या सर्व रस्त्यांना ओळख देण्याचा कार्यक्रम या निमित्ताने सुरू होतोय. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे की जे गावातल्या शेतात जाणार्या रस्त्याला ओळख क्रमांक देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र याही बाबतीमध्ये देशाला दिशादर्शन ठरणार काम करीत आहे.पंतप्रधाना मोदी यांनी राज्याला जवळपास 30 लाख घरकुले मंजूर केलेली आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्याला जवळपास 44 हजार घरकुलांची मंजुरी मिळालेली आहे. ज्यांना घर नाही अशा प्रत्येकाचे पक्क्या घराचे स्वप्न या घरकुलांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. ज्या नागरिकांकडे स्वतःची जमीन नाही किंवा भूखंड नाही, अशांना शासनाने एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य हे भूखंड खरेदी करण्यासाठी देत आहे . जोपर्यंत शेवटच्या माणसाला घरकुलासाठी भूखंड आपण देत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. ज्यांनी 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर पक्के घर बांधलेले असेल त्याच्याही मोजणी करून शासनाने अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शंभर दिवसांमध्ये यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये झालेली सर्व भूसंपादनाचे अवॉर्ड संगणकृत केलेले होते. एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलेले आहेत आता त्याचा फायदा झालेला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून प्रत्येक गावामध्ये स्वस्त धान्य दुकानांच्या सेवा क्यु आर कोड च्या माध्यमातून आपण नागरिकांशी जोडत आहोत. या दुकानाच्या सेवां बद्दल, सेवाविषयक अभिप्राय नोंदवण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी कोणत्याही नागरिकाला तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येण्याची गरज नाही. या क्यू आर कोड च्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला महिन्यामध्ये किती धान्य आलेले आहे, किती दराने, किती प्रमाणात त्यांनी वाटणे अपेक्षित होते, दुकानदारांची नागरिकांशी असणारी वर्तणूक याबाबतचा अभिप्राय घरबसल्या नोंदविता येणार आहे.जिल्ह्यातील सर्व आपली सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र यांच्या कामकाजाचं मूल्यांकन करण्याचा अधिकार या आज पासून जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. राखीव व्याघ्र प्रकल्पातील काही गावांचे पुनर्वसन अद्यापही बाकी आहे, असे सांगून ते म्हणाले, या पंधरा दिवसांमध्ये ज्या तीन गावांना वनविभागाने जमीन निश्चित करून दिलेली आहे त्याचा आरेखण करणे, प्लॉट वाटप करणे आणि त्यांना शेतीचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी ग्री स्टॅक मध्ये नोंदणी करण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करुन रास्तभाव दुकान व सेवा केंद्राच्या मुल्यांकन करणारे क्युआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. तसेच शाहीर राजेंद्र भोसले यांनी महसूल प्रशासनाने केलेल्या कामकाजावर पोवाडा सादर केला. महसूल विभागाने पाणंद रस्त्याबाबत केलेल्या कामाची चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली.