स्थैर्य, औरंगाबाद,, दि.०८: ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी अद्ययावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा-सुविधांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णास सर्व उपचार मिळणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तावित ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, दुरूस्ती यावर लक्ष देऊन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे लक्ष द्यावे असे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोनाविषयक आढावा बैठकीत प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर गलांडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी तसेच आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णलय या विषयीचा सविस्तर आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी यावेळी सादर केला.
जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत गुणवत्तापूर्ण भर घालण्यासाठी नवीन अद्यावत रुग्णवाहिका खरेदी प्रस्ताव त्याचप्रमाणे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याबाबत लोकसंख्या आणि स्थानिक गरज लक्षात घेता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले. त्याचप्रमाणे बंद पडलेले शिवना आणि गोंदेगाव येथील युनानी रुग्णालये दुरूस्तीचे निर्देशही दिले. प्रस्तावित नवीन पाच ग्रामीण रुग्णालयात शिवूर, लासूर स्टेशन, वाळूज, आडूळ आणि विहामांडवा या प्रस्तावित आरोग्य केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यामध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री.सत्तार यांनी केले.
या बैठकीदरम्यान जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या राज्य शासनासह स्थानिक आमदार निधीतून रुग्णवाहिका प्रस्तावित खरेदी संदर्भात तांत्रिक गुणवत्तापूर्ण रुग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावावर विचारमंथन करण्यात आले. तसेच या रुग्णवाहिकेत उपलब्ध असलेल्या सुविधांचा दर्जा तसेच आरोग्यदायी प्रवास क्षमता तपासून खरेदी करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात असलेले मंजूर असलेले आयुर्वेदीक दवाखाने, युनानी दवाखाने, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले रुग्णालये, जिल्हा आयुष धोरण व आराखडा व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या साहित्य व यंत्रसामुग्री तसेच रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा याबाबत आढावा श्री.सत्तार यांनी यावेळी घेतला.
बैठकीनंतर मंत्री महोदयांसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, यांनी विविध कंपन्यांच्या रुग्णवाहिकांची पाहणी केली.