महिला व बालकांशी संबंधित प्रश्न प्राधान्यक्रमावर घ्या – ॲड. यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

प्रत्येक महिन्याला घेणार जिल्हास्तरीय आढावा

स्थैर्य, मुंबई, दि. 22 : महिला व बालविकासाच्या योजना या लोकचळवळ बनल्या पाहिजेत या मुद्द्यावर भर देताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेने महिला व बालकांशी संबंधित प्रश्न प्राधान्यक्रमावर घ्यावेत, असे निर्देश दिले. महिला व बालकांशी संबंधित जिल्हास्तरीय कामकाजाचा प्रत्येक महिन्याला आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांचा बाल न्याय अधिनियम तसेच बाल संरक्षणाशी संबंधित बाबींचा आढावा ॲड.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो तसेच राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

राज्यातील बाल कल्याण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, या समित्यांनी नियमित बैठक घेणे बंधनकारक असून त्यांच्याकडून बाल संरक्षण प्रकरणात देण्यात येणारे आदेश, आदेशांची गुणवत्ता आणि कालबद्ध नियोजनाबाबत कार्यपद्धती बनविण्यात यावी. एकाच आदेशानुसार अनेक बालकांना बालगृहात प्रवेश देण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. काही ठिकाणी नोंदणीकृत नसलेल्या बालगृहात बालकांना प्रवेश दिल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीर पद्धतीने दत्तक प्रक्रिया राबविल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नसून अशा प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

कोणत्याही योजना, उपक्रमांची अंमलबजावणी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात झाल्याशिवाय संबंधित घटकाला न्याय मिळू शकणार नाही, असे सांगून मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी बाल कल्याण समित्या बळकट करण्यावर भर दिला पाहिजे. एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बाल संरक्षण युनिट (डीसीपीयु)मधील रिक्त पदे तात्काळ भरावीत. ग्राम बाल संरक्षण समित्या बळकट करणे तसेच त्यांचे प्रशिक्षणे घेणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

या बैठकीत हुंडा प्रतिबंध अधिनियम, बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो ॲक्ट), मनोधैर्य योजना, समुपदेशन केंद्रे तसेच सखी केंद्रे (वन स्टॉप क्रायसीस सेंटर्स), बालविवाह प्रतिबंध आदींबाबत जिल्हास्तरावरील कामाचा आढावा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून घेण्यात आला. मनोधैर्य योजनेमध्ये बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत अत्याचारपिडीत बालके तसेच ॲसिडहल्ल्यांच्या पिडीतांच्या अर्जांची वाट न पाहता त्यांना आर्थिक सहाय्य तातडीने देण्यासाठी संवेदनशीलता दाखविली पाहिजे, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

महिला व बालकांशी संबंधित सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आलेली ‘महिला व बालविकास भवन’ उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सुयोग्य जागा तातडीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच त्यासाठी आवश्यक तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्याबाबतही नियोजन सुरू आहे. बालगृहातील अनाथ बालकांना कौटुंबिक वातावरण मिळावे यासाठी प्रतिपालकत्व योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा प्रचार प्रसार करण्यात यावा.

‘वन स्टॉप सेंटर्स’ तसेच पोलीस ठाण्यांच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘व्हायलंन्स अगेंस्ट वुमेन’ कक्षांसाठी पिण्याचे पाणी, महिलांना स्वच्छतागृहांची सुविधा तसेच बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासह महिलांना दिलासादायक परिस्थिती निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक तसेच संबंधित पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावा. 2011 च्या शासन निर्णयानुसार महिलांशी संबंधित योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्या असून त्यानुसार काटेकोर काम करावे, अशाही स्पष्ट सूचना ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सचिव श्रीमती कुंदन यांनी प्रस्तावना केली तसेच आयुक्त श्री. यशोद यांनी सादरीकरण करुन जिल्हानिहाय माहिती सादर केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!