स्थैर्य, दि.११: देशात येत्या १६ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या वेळी राज्यांत या लसीकरणासाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्री पंतप्रधानांना देतील. दुपारी ४ वाजता ही बैठक व्हीसीवर सुरू होत असून देशात दोन कोविड लसींच्या लसीकरणाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. भारतात ऑक्सफर्डची कोविशील्ड (सीरम, पुणे) आणि कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक) या दोन लसींच्या आपत्कालीन वापराची ड्रग कंट्रोलरने परवानगी दिल्यानंतर प्रथमच अशी बैठक होत आहे.
देशात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत सहा वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या लसीकरणासाठी देशभर रंगीत तालीम घेण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश राज्यांत लसीकरणाची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र आहे.
या मोहिमेत प्रारंभी १ कोटी हेल्थकेअर वर्कर्स आणि २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. याशिवाय या विषाणूच्या संपर्कात आल्याची किंवा येण्याची शक्यता असलेल्या इतर २७ कोटी लोकांना डोस देण्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे. या लसीच्या खरेदीसाठी पीएम केअर फंड वापरला जाण्याची शक्यता आहे.