पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मार्च २०२३ । पुणे । सरकारने यंत्रणांचा वापर करून राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली. ही लोकशाहीची हत्या आहे. ही गळचेपी, मुस्कटदाबी आहे. हे सरकार अहंकारी असून त्याचा निषेध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात, त्यामुळे त्यांच्यावर अशी कारवाई केली जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आले. तसेच त्यांना खासदार म्हणून दिलेला बंगला खाली करण्याची नोटीस देण्यात आली. या कारवाई विरोधात काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पिंपरी येथे पक्षातर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आमदार शिंदे बोलत होत्या. काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेसने देशभरात जय भारत सत्याग्रह सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही केवळ राजकीय मुद्दा नाही. तर हा प्रश्न लोकशाहीचा आहे. भाजपची लोकं गांधी परिवाराबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलले त्यावेळी कारवाई झाली नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळाल्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे ही कारवाई केली. इडी, सीबीआय अशा यंत्रणांचा वापर करून ‘डिस्क्वाॅलीफाय’ केले. ‘हम झुकेंगे नही’, आम्ही लढणार. महाराष्ट्रातील सरकार देखील इडीचा दबाव आणून स्थापन केले आहे. हा लोकशाहीचा खून आहे. त्यांच्याकडे जनमत नाही. त्यामुळेच महापालिका निवडणुका घेतल्या नाहीत. आता दंगली घडवून आणतील आणि महापालिका निवडणुका घेतील.

‘तो’ देशद्रोह नाही का?

भाजपची काही लोकं महिलांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. महिलेकडे वस्तू म्हणून बघितले जाते. भाजपमधील याच मानसिकतेमुळे व विचारसरणीमुळे देशाची अधोगती होत आहे. महिलांना काहीही बोलता तो देशद्रोह नाही का, असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

‘महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे’

राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. मात्र, त्यासोबतच महिलांकडे नगरविकास, अर्थ व इतर महत्त्वाची खाती दिली पाहिजेत. मात्र, सध्या राज्याचे महिला व बाल विकास खाते देखील महिला आमदाराकडे नाही. ही आपल्यासाठी खेदाची बाब आहे, असे म्हणून प्रणिती शिंदे राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर निशाणा साधला.


Back to top button
Don`t copy text!