डासांची उत्पत्ती रोखा…डेंग्यूला दूर हटवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । पावसाळ्यात काही भागात जास्त पाऊस येण्याची शक्यता असते. साहजिकच डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले आहे.

एडीस एजिप्ती डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीमध्ये प्रत्येक गावात घरांना भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासले जाणार आहेत. पाणीसाठ्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करावी लागतात. रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा ॲबेटचे द्रावण टाकण्यात येणार आहे.

डेंग्यू कसा ओळखाल?

सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो. अंगावर लहान-लहान पुरळ येतात. जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या अन्‌ मळमळ होते.रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होऊन अशक्त‌पणा जाणवतो. डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडिस इजिप्ती व एडिस अलेबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला आजार होतो. डेंग्यू हा सामान्यत: आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रुग्ण बरे होतात. डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

डेंग्यू ताप लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, चव आणि भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.

डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप

हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव – चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्‌सची संख्या कमी होणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, श्वास घेताना त्रास इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.

डेंग्यू विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट औषधोपचार नाहीत, मात्र लक्षणे आणि चिन्हानुसार औषधे दिली जातात. ताप आणि अंगदुखी कमी करण्यासाठी वेदनाशामक पॅरासिटीमॉल औषध गुणकारी आहे. ॲस्पिरीन, ब्रुफेन, स्टिरॉइडस, प्रतिजैविके औषधे वापरू नयेत. रूग्णाच्या शरीरातील पाणी, रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास शिरेवाटे काढून अथवा प्लेटलेटस देणे गरजेचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारातील रूग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित उपचार द्यावे लागतात.

आजारापासून असे राहा दूर…

आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा. घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका. सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!