
स्थैर्य, सातारा, दि. 26 ऑगस्ट : गणेश चतुर्थीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले आहे. श्री गणेशाच्या आगमनाची घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जय्यत तयारी सुरू असून, बाजारपेठा खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत आहेत.
जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये सध्या चैतन्याचे वातावरण आहे. गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. सातार्यातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या गणेश मूर्तींच्या स्टॉलवर भक्तांची गर्दी दिसून येत आहे. या स्टॉल्सवर लावण्यात आलेल्या आरत्या आणि भक्तिगीतांमुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले आहे. अनेक सार्वजनिक मंडळांचे बाप्पा मंडपामध्ये दाखल झाले असून, घरगुती उत्सवासाठीही नागरिकांनी मूर्ती घरी नेण्यास सुरुवात केली आहे.
यंदा पावसाचे सावट कायम असल्याने सार्वजनिक मंडळांनी विशेष काळजी घेत मंडपांची उभारणी केली आहे. अनेक मंडळांमध्ये देखाव्यांची आणि सजावटीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
कुंभारवाड्यांमध्येही मूर्तिकारांची लगबग सुरू असून, नोंदणी केलेल्या मूर्ती वेळेवर देण्यासाठी त्यांची धांदल उडाली आहे. परगावी जाणार्या मूर्तीही रवाना होत आहेत. एकंदरीत, घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली असून, सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा उत्साह आणि जल्लोष पुढील दहा दिवस असाच कायम राहणार असून, संपूर्ण जिल्हा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी सज्ज झाला आहे. गणेशोत्सव ही व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी असते. उत्सवकाळात बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढते. आकर्षक साहित्य मांडणी व विविध ऑफर्स ठेवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आपली दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने सजवली आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सातारा शहरातील बाजारपेठेत विविध रंगी विद्युत रोषणाईचा झगमगाट डोळ्यांचे पारणे फेडत आहे. खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांना गणेशोत्सव सुरू झाल्याची झलक अनुभवायला मिळत आहे.