दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । सातारा । राज्यातील महा विकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नगरोत्थान अंतर्गत एक रुपयाचा निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली
जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या प्रवीण दरेकर यांनी सातारा येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टिका केली. प्रवीण दरेकर म्हणाले, राज्य सरकार शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाईन उद्योगाला चालना देत आहे. खरंतर या निणर्यावर राज्यभरातून टिका होत आहे. त्या अण्णा हजारे यांच्यासारखे ज्येष्ठ समाजसेवक तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे राजकीय नेत्यांनीही सडकून टिका केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या व शेतकऱ्यांच्या जोरावर राष्ट्रवादीने इतकी सत्ता उपभोगली त्या कारखानदारीकडे महा विकास आघाडी सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. केंद्र शासनाच्या योजनेमुळेच कारखानदारीला दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ हजार 361 कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिले तसेच प्रतिक्विंटल सहाशे रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले या शिवाय इथेनॉल निर्मिती मधून राज्याला पंधरा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मात्र, एफआरपी संदर्भात ठोस निर्णय घेताना राज्य शासन दिसत नाही. ज्यांच्या जीवावर राजकारण सुरू आहे त्या साखर कारखानदारारांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून या योजनेचे नियम डावलून अनेक संस्थांना येथे कामे देण्यात आली आहेत. या सर्व प्रश्नांवर विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मी आवाज उठवणार असून या प्रकरणाची पोलखोल करणार आहोत. महाविकास आघाडी सरकार हे असून नसल्यासारखे आहे. धनदांडगे रेस्टॉरंट बार वाईन शॉपवाल्यांची जी साखळी आहे त्यांच्यासाठी हे सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांना वाईनचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी केला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात या सरकारच्या कार्यकाळात मला जगण्याची इच्छा नाही त्यांची ही टिप्पणी अतिशय गंभीर आहे साताऱ्याच्या हद्द वाढीनंतर नगरोत्थान अंतर्गत एक दमडीसुद्धा अद्याप देण्यात आलेली नाही. सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा एक रुपया सुद्धा अद्याप मिळालेला नाही. सातारा जिल्ह्यातील केंजळ येथे पोलिसांच्या बंदोबस्तात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. शासनाची ही कृती निंदनीय आहे. मग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासकीय जागेवर जे दर्गा वा थडगे आहे ते हलवताना जातीयवाद आडवा येतो काय ? संघर्षजन्य परिस्थिती निर्माण करून लोकांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचे शासन चुकीचे धोरण राबवत आहे. महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी केलेल्या तीन नेत्यांच्या अटकेबाबत विधान केले होते. या विधानाबाबत दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, राऊत असे गौप्यस्फोट नेहमीच करत असतात त्यामध्ये गोपनीय असे काहीच नसते. त्यांची विधाने म्हणजे फुसके बार आहेत त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही.
सातारा सातारा पालिकेच्या आगामी निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र लढणार का भाजपचे एकत्र पॅनल असणार का या विषयावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले दोन्ही नेते भाजपचे येत आहेत या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस ठरवतील प्रदेश कार्यकारिणी पातळीवर या प्रश्नांचा निर्णय होईल त्यामुळे स्थानिक आघाड्यांच्या संदर्भात आताच बोलणे उचित ठरणार नाही. एसटी विलीनीकरण संदर्भात शासनाचे धोरण सुस्पष्ट नाही त्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रचंड अडचणीत आहेत. या प्रश्नावर सुद्धा विधानपरिषदेत आवाज उठवणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावेळी आमदार महेश शिंदे यांची झालेली भेट कसल्याही राजकीय स्वरूपाची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.