प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा; प्राथमिक पाहणीनंतर आ. शिवेंद्रसिंहराजेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि शिवरायांच्या पराक्रमाची अखंड साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले प्रतापगड आणि अजिंक्यतारा किल्ल्यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करा. या दोन्ही किल्ल्यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू, असे आश्वासक प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
किल्ले प्रतापगड आणि अजिंक्यतारा किल्ल्यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यासंदर्भाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवकरच तज्ञ् सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही किल्ल्यांची प्राथमिक पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सातारा यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कोल्हापूर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी या दोन्ही किल्ल्यांची नुकतीच पाहणी केली. किल्ल्यांच्या सुधारणा व सुशोभीकरणाच्यादृष्टीने  आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत नागेशकर यांनी चर्चा केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग साताराचे उप अभियंता राहुल अहिरे, महाबळेश्वरचे उप अभियंता महेश ओंजारी, कनिष्ठ अभियंता संजय तवले आदी उपस्थित होते.
प्रतापगड किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी दुरुस्ती करणे, तलावांची स्वछता करणे आणि वास्तूंचे पुरातन ऐतिहासिक स्वरूप व सौन्दर्य कायम ठेवणे, अशा पद्धतीने सुशोभीकरण करणे तसेच भवानी माता मंदिरात काहीठिकाणी सिमेंट बांधकाम झाले आहे तेथे जुन्या पुरातन पद्धतीने बांधकाम करणे, नगारखाना, राजमार्ग दुरुस्ती या सर्व बाबींची सुधारणा शिवकालीन ठेवणीप्रमाणे झाली पाहिजे. यासाठी सुमारे २०० कोटी निधी अपेक्षित असून काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा झाली.
अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई देवी मंदिराची सुधारणा करणे. दक्षिण दरवाजा आणि किल्ल्यावरील वॉकिंग ट्रॅक यांची सुधारणा करणे. जुना राजवाडा आणि सदर, तलाव यांचेही बांधकाम, सुधारणा आदी बाबी पुरातन आणि ऐतिहासिक ठेवणीला धरून करण्याबाबत चर्चा झाली. या दोन्ही कामांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे तातडीने पाठवा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात बैठक घेण्यास सांगू आणि जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. तसेच मी वैयक्तिक माझ्या कुटुंबाकडूनही आर्थिक मदत करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!