
दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कामकाज महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व कृषी विभागांमध्ये विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने कृषी विभागातील जिल्हा नोडल अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका नोडल अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी यांना पी.एम. किसान योजनेचे ‘लॉगिन’ उपलब्ध झाले असून ते आता तालुकास्तरीय नोडल अधिकारी असतील, अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थी हा जमीनधारक आहे का? याची पडताळणी आणि अपात्र लाभार्थी यांचेकडून परतावा वसुली, ही दोन कामे तालुकास्तरीय नोडल अधिकारी करतील. तसेच पात्र लाभार्थीना अनुदान मंजुरी देणे, मयत लाभार्थी वगळणे व अनुषंगिक सर्व कामकाज आता तालुका कृषी अधिकारी करतील.
पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थींच्या भूमी-अभिलेख नोंदी अद्ययावत करणे व अपात्र लाभार्थींकडील लाभ परतावा वसुल करणे या बाबींच्या अंमलबजावणीची जबाबदारीही महसूल विभागास देण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाकडून पी.एम. किसान योजनेच्या १५ व्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सुरू असून ऑक्टोबर २०२३ मधील पुढील आठवड्यात लाभ अदा करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार प्रलंबित लाभार्थ्यांचा निपटाराही प्राधान्याने होणार आहे, अशी माहितीही तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.