कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २४: महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहून केली होती.

आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांसाठी मोफत 5 किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याने ती सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील केंद्र सरकारशी चर्चा करण्याची विनंती केली होती. श्री.पवार यांनी देखील या पत्राचा तातडीने विचार करत केंद्र सरकारशी चर्चा केली आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1 लाख 40 हजार मेट्रिक टन तांदळाची तर 2 लाख 40 हजार मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या 7 कोटी लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहोचवू शकतो असे श्री.भुजबळ यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आज केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे देशात 80 कोटी नागरिकांना मे आणि जून महिन्यांमध्ये 5 किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे. अन्न, सुरक्षा योजनेच्या राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना काळात जारी कराव्या लागलेल्या कठोर निर्बंधांमुळे अनेक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी भुजबळांनी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे भुजबळांनी केंद्र सरकार आणि या  मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार शरद पवार यांचे आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!