महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारांनी जनसामान्यांना जगण्याचे बळ दिले – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १४: महाराष्ट्रात धर्मकारण व राजकारणातून सुरु झालेल्या प्रबोधनाच्या विचारधारांनी क्रांती घडवून आणत जनसामान्यांना जगण्याचे बळ दिले, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारा काल, आज आणि उद्या  या विषयावर 26 वे पुष्प गुंफताना डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.

महाराष्ट्राला प्रबोधनाच्या विचाराधारेची ३०० वर्षांची जुनी परंपरा असून या प्रबोधनपर्वाची सुरुवात धर्मकारण आणि राजकारणातून झाली. जुलमी राजवटींविरुद्ध बंड पुकारून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात प्रबोधनाचा  पाया रचून तो कळसापर्यंत नेण्याची व छात्रतेजाची परंपरा सुरु केली.  महात्मा  ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या सामाजिक कुप्रथा व परंपरांविरोधात प्रखर आवाज उठवत प्रबोधानाची विचारधारा पुढे नेली. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर प्रबोधनाची ही परंपरा अधिक समृद्ध होत आज शाश्वत विकासाच्या  उद्दिष्टापंर्यंत येऊन पोहोचली आहे. प्रबोधनाची ही उज्ज्वल परंपरा गावागावात पोहचवणे ही भविष्याची दिशा असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

प्रबोधनाच्या विचारधारांचा आधार धर्म, शिक्षण, संस्कृती, कुटुंबात होणारे संस्कार, कायदा, राज्याचे शासन-प्रशासन, माध्यमे आदी  घटकांमध्ये असतो. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय राजवटींच्या अन्यायाविरूद्ध येथील सामान्य माणसाला उभे करून आत्मबळ दिले व नवे प्रबोधन पर्व सुरु झाले.

महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या परंपरांचा विचार करताना बाल विवाह, हुंडाबळी, सतीप्रथा, परित्यक्ता म्हणून स्त्रियांचा अव्हेर, केशवपण  या सर्व अनिष्ट प्रथा परंपरांना धर्माचा आधार असल्याचे दिसून आले. समाजसुधारक व संतांनी यावर प्रहार केला त्यासाठी समाज संघटन घडवून आणले. संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखा आदी संतप्रभावळींनी महाराष्ट्रातील अनेक जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन समतेचा पाया रचला. धर्मासंबंधात महात्मा फुले यांनी निर्मिकाची संकल्पना मांडली व पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा विचार स्वीकारला हा महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेचा वेगळा टप्पा ठरला असे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

समाजाच्या सर्व स्तरातील माणसांना शिक्षण दिले जावे, त्यांचे धाडस वाढवावे यासाठी समाजसुधारकांनी कार्य करून प्रबोधनाच्या विचारधारा मजबूत केल्या. यामध्ये मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह काढणारे व मुलींना शिक्षणाचा लाभ देणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज तसेच मुलगामी चिंतनातून या प्रबोधनाला दिशा देणारे न्या.महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई  आदींचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी केलेल्या कार्यातून समाजात विचारांची घुसळन सुरु झाली असे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

राज्यात स्वातंत्र्य लढ्याबरोबर समांतरपणे महिलांनी प्रबोधनाची चळवळ उभारली. यात पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, डॉ.आनंदी जोशी, रख्माबाई यांनी महत्त्वाचे कार्य केले . तसेच महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे महिला शिक्षणासाठीचे  व संतती नियमनाचे विचार मांडून सामाजात मानसिक व  वैचारिक धक्के देणारे र.धो.कर्वे यांचे कार्यही अमूल्य असल्योचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून राज्यात प्रबोधनाची मोठी पंरपरा पहायला मिळाली . यात चळवळीत योगदान देणारे सेनापती बापट, एस.एम. जोशी, ना.ग गोरे, प्रबोधनकार ठाकरे,आचार्य अत्रे, दादासाहेब गायकवाड आदींच्या नेतृत्वाने समाजाला दिशा दिल्याचे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्रातील भाषा, साहित्य आदी वचळवळींना धुमारे फुटले नवविचाराचे प्रवाह सुरु झाले यातून नवीन संघटना उदयाला आल्या. यात शिवसेना, आदिवासींसाठी काम करणारी मार्क्सवादी विचाराची श्रमीक संघटना, युवकांमध्ये समाजवादी विचार जागविणारे युवक क्रांतीदल, राष्ट्रसेवादल, दलित पँथर, समाजवादी युवक परिषद, दलित युवक परिषद या संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्यामधून अनेक मुद्दे मांडले गेले आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील उपेक्षित समाजघटकाचे चित्रही पुढे आले. प्रबोधनाच्या परंपरा मजबूत करण्यासाठी राज्यात महिला धोरण आवश्यक असल्याचे, सामाजिक न्याय विभाग वेगळा करणे आवश्यक असल्याचे व भटक्या विमुक्त जातींचे विभाग वेगळे करणे आवश्यक असल्याचे विचार पुढे आले.

राज्यघटनेच्या  १४, १५ व १६ व्या कलमानुसार महिलांना राजकारणात आरक्षणाचे पाऊल पडले  व यातून राजकारणातील प्रबोधनाला सुरुवात झाली. महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग सुरु झाला. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे प्रश्न दृष्य झाले व ते सोडवले गेले.

प्रबोधनाच्या परंपरेची आजची विचारधारा या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपर्यंत येऊन पोहोचली आहे. पर्यावरण स्नेही उद्योगाला चालना, प्रत्येकाला स्वच्छ पाण्याचा, रोजगाराचा, आरोग्याचा अधिकार तसेच नैसर्गिक संपदा व साधनांना समृद्ध करण्याचे कार्य सुरु झाले. तापमान बदल, पर्यावरण या विषयांचा अंतर्भाव करून विकासामध्ये सर्वांना सहभागी करून घेत शाश्वत विकासाकडे राज्याची वाटचाल सुरु आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध प्रबोधन पंरपरेला गावोगावांपर्यत पोहोचविणे हीच भावी प्रबोधनाची दिशा असेल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!