फलटणमध्ये चायनीज मांजा बंद करण्यासाठी निघाली प्रभातफेरी


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण तालुका परिसरात नागपंचमी सणानिमीत्त बरेचसे हौशी लोक बंदी असलेल्या चायनीज मांजाचा वापर पतंग उडवण्यासाठी करतात. यामुळे हजारो पशूपक्षी व मानवांना असा धागा लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे, तर काहींचे जीव गेले आहेत. तरी या खुनी मांजाचा वापर पतंग उडवण्यासाठी पूर्णपणे बंद केला गेला पाहिजे, यासाठी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण संस्थेच्या माध्यमातून आज मुधोजी हायस्कूल येथून प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये फलटण शहर पोलीस स्टेशन, वनविभाग फलटण, मुधोजी हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी वर्ग, आकांशा क्लासेसचे शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.

चायनीज मांजा बंदी व नागपंचमी सण याविषयी पोलीस निरीक्षक श्री. शहा सर, वनपाल श्री. आवारे सर, प्रा. श्री. इंगळे सर, आकांशा क्लासेसचे श्री. जाधव सर आणि संस्थेच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण संस्थेद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, चायनीज मांजाचा पतंग उडवण्यासाठी वापर बंद करून पशूपक्षांचे व निष्पाप लोकांचे जीव वाचवावे आणि पारंपरिक धाग्याने पतंगोत्सव साजरा करून झाल्यावर वापरलेला धागा झाडांमध्ये, रस्त्यावर आणि परिसरात दिसल्यास तो गोळा करून त्याचे व्यवस्थापन करावे. तसेच फलटण परिसरात धाग्यामध्ये जखमी अवस्थेत पक्षी आढळून आल्यास संस्थेला ७५८८५३२०२३ या मोबाईलवर संपर्क करावा.


Back to top button
Don`t copy text!