प्रभाकर शिंदे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि.१२: धोम धरण पुनर्वसन कमिटीने उभारलेल्या लढ्यातून महाराष्ट्रात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कायद्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. त्यामध्ये प्रभाकर शिंदे यांचा वाटा मोठा होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पाटबंधारे सचिव म. वा. देसाई यांनी त्याकामी दिलेले योगदान धरग्रस्तांना विसरता येणार नाही.,अशा शब्दांत दिवंगत प्रभाकर शिंदे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली.
चांदवडी(ता. कोरेगाव)येथे दिवंगत शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.

प्रभाकर शिंदे यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते. मुंबईच्या सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. वसंत सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी गिरणी कामगारांना आर्थिक सहकार्य करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षे त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व केले. पुनर्वसनानंतर कोरेगाव तालुक्यात चौंडेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणासाठी विद्यालये उभारली. रहिमतपूर येथील कवी गिरीश यांचे स्मारक उभारण्यात प्रभाकर शिंदे यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
यशवंतराव चव्हाण, राजाराम बापू पाटील, शंकरराव पाटील, बाळासाहेब देसाई, अरुण मेहता, अभयसिंह राजेभोसले, शाहीर साबळे यांच्याशी प्रभाकर शिंदे यांचा जवळचा संबंध होता तर वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले.
प्रभाकर शिंदे यांचे सर्व क्षेत्रातील कार्य समर्थपणे पुढे सुरु ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल,अशा शब्दांत मान्यवरांनी शिंदे यांचे गुणसंकीर्तन केले.

सुरुवातीला शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली माजी माजी मंत्री डॉक्टर शालिनीताई पाटील आमदार शशिकांत शिंदे यांचे शोक संदेश यावेळी वाचण्यात आले. दरम्यान, या श्रद्धांजली सभेत राजेंद्र शेलार, प्रा. अरुण माने, मार्केट कमिटीचे संचालक श्रीमंत नि. झांजुर्णे, शिवकृपा सह. पतपेढीचे संस्थापक- अध्यक्ष कृष्णा शेलार, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक श्रीमंत सर्जेराव झांजुर्णे, कोयना धरणग्रस्त संघटनेचे शिवराम संकपाळ, दरेचे सरपंच आनंदराव जाधव, शिवाजीराव गाढवे, विठ्ठल अंब्राळे, अंकुश चोरट, एकनाथ पिसाळ, बबनराव निकम, शिवराज शिर्के, टी. जे. सणस, विनोद शिंदे, मनोहर वाघ यांची भाषणे झाली.
धरणग्रस्त आजीमाजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष मंगलदास गायकवाड, रघुनाथ सणस, संजय शेलार, भाऊसाहेब चोरट, गोवे दिगरचे सरपंच यशवंत पिसाळ, कोंढवलीचे माजी सरपंच सपकाळ, राजेंद्र शेलार, नामदेव शेलार, विजय शेलार तसेच कोयना, धोम, कण्हेर धरणग्रस्त संघटना, कृष्णा प्रकल्पग्रस्त विकास संस्था, चौंडेश्वरी शिक्षण संस्था या संस्थांचे पदाधिकारी व चांदवडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदवडीचे सरपंच विश्वास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!