स्थैर्य, कोळकी दि.१३ : कोळकीत युवा वर्गाचे परिवर्तन झाले आहे. गावाच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र येऊन कोळकीचा कायापालट करावा. कोळकीतील जनता राष्ट्रवादीच्या त्याच त्याच उमेदवारांना कंटाळली आहे. आता बदल अटळ आहे, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. दरम्यान यावेळी कोळकी येथील सामाजिक कार्यकर्ते जुनेद शेख यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
कोळकी (ता.फलटण) ग्रामपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्रीराम पॅनेलचे प्रभाग क्रमांक ३ मधून धर्मराज देशपांडे, सौ. प्रियांका हिंगसे, सौ. कोमल जाधव व प्रभाग क्रमांक ४ मधून स्वप्नाली पंडित व गोरख जाधव या उमेदवारांसह यावेळी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, कोळकी चे निवडणुक प्रभारी अनुप शहा , कामगार आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद , युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, पै. स्वागत काशिद उपस्थित होते.
यावेळी बोलताना, खासदार म्हणून गावाला सर्वतोपरी विकासासाठी आपण मदत करणार असून सत्ता भाजपची आल्यास तालुक्यासाठी कोळकी हे आदर्श मॉडेल बनवणार असल्याचे सांगून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, भविष्यात जुनेद शेख यांना आपण मोठी ताकद देऊ.
जुनेद शेख यांनी बोलताना सांगितले की, कोळकीत घराघरात जाऊन सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करू.आम्ही राष्ट्रवादी चे काम करताना असताना आमच्या मंडळातील कटीकर्त्यांपैकी एकाला तिकिट मागितले पण ते देऊ शकले नाहीत. आम्ही किती दिवस नुसते काम करायचे? त्यामुळे राष्ट्रवादीवर अनेक युवक नाराज झाले आहेत. यावेळी वार्ड २, ३, ४ यामध्ये नक्की परिवर्तन होणार असून आता कोळकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालीच व जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, प्रभारी अनुप शहा, पै बाळासाहेब काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जुनेद शेख यांनी स्पष्ट केले.