पालिका निवडणूकीच्या आखाड्यात रंगणार सत्ता संघर्ष; निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच कार्यकर्ते झाले अ‍ॅक्टीव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 10 जुलै 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । आधी कोरोना आणि नंतर ओ.बी.सी. आरक्षण यामुळे लांबणीवर पडत गेलेली फलटण नगरपरिषदेची निवडणूक अखेर जाहीर झाली असून आगामी 40 दिवस पालिका निवडणूकीच्या आखाड्यात जोरदार सत्ता संघर्ष पहायला मिळणार आहे. निवडणूकीच्या अनिश्चिततेमुळे कार्यकर्त्यांच्यात काही अंशी मरगळ दिसत होती मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच कार्यकर्ते जोमात अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे.

फलटण नगरपरिषदेच्या सन 2022 ते सन 2027 या कालावधीसाठी निवडणूकीची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या घोषित कार्यक्रमानुसार दिनांक 20 जुलैपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असून दिनांक 22 ते 28 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे, दिनांक 29 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे तर दिनांक 4 ऑगस्ट पर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर प्रचाराची खरी रंगत सुरु होऊन दिनांक 18 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिनांक 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होवून फलटणकरांचा कौल स्पष्ट होणार आहे.

फलटण पालिका निवडणूकीचा इतिहास पाहता फलटण नगरपरिषदेवर सन 1991 पासून सलग 30 वर्षे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेच निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. मात्र सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयानंतर केवळ फलटण शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात ना.श्रीमंत रामराजे यांना तगडे राजकीय आव्हान निर्माण झाले असून याच अनुषंगाने यंदाची पालिका निवडणूक चुरशीची होणार आहे. ना.श्रीमंत रामराजे यांनी फलटण शहरात शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता केली असली तरी दुसरीकडे खा.रणजितसिंह यांनीही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्त्वाच्या मदतीने रेल्वे, पाणी आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर नागरिकांची मने जिंकली आहेत. तरी ही नागरिकांच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेले मुलभुत प्रश्न सोडविण्यात त्यांना परिपुर्ण यश आले आहे, असे म्हणता येणार नाही.

फलटण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी यांच्या बरोबरीने राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनाही कार्यरत असून महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरुन लागू होणार कां? जर तसे झाल्यास त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होणार कां? आणि जर तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच राजे गट, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेणार कां? असे सवाल शहरातील राजकीय चर्चांमध्ये आघाडीवर पहायला मिळत आहेत.

या निवडणूकीसाठी प्रभाग रचनेमध्ये झालेली उलथा-पालथही अनेकांच्या जिव्हारी लागली असून नवीन प्रभागरचनेनुसार मतदारांची आकडेमोड करताना संभाव्यांना अवघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. नवीन प्रभागरचना नेते मंडळींसाठीही अंतिम उमेदवार निवडताना डोकेदुखी ठरु शकते, असेही अंदाज स्पष्ट केेले जात आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 20 जुलै रोजी निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिकार्‍यांमार्फत घोषित होणार असून येत्या काळात पालिका निवडणूकीचा आखाडा हळूहळू तापून प्रत्यक्ष सत्तासंघर्षाची लढाई लवकरच सुरु होणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी कुणाला किती संघर्ष करावा लागणार? प्रचाराची मोहिम कोण प्रभावीपणे राबवणार? मतदानाचा कौल मिळवण्याकरिता कोण कशी रणनिती आखणार?, कोणता उमेदवार कुणाला भारी पडणार? हे सर्व काही पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजे गटामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय असून माजी नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारांची मोट बांधून तिसरी आघाडी स्थापित करुन शहरातील सर्वच्या सर्व जागा लढवायची आखणी गेल्या काही वर्षांपूर्वी झाली होती अशी चर्चाही सुरु असून मात्र आता नंदकुमार भोईटे यांच्या अकाली निधनाने त्यावेळी या मोहिमेचा भाग असलेले कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार? व स्व. नंदकुमार भोईटे यांची भुमिका आता कोण निभावणार ? याबाबतही विविध चर्चा होताना दिसत आहे.


Back to top button
Don`t copy text!