राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याची मागणी; निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता


स्थैर्य, फलटण, दि. १६ सप्टेंबर: महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गत काही महिन्यांपूर्वी, येणाऱ्या चार महिन्यांत राज्यातील रखडलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, निवडणुका संपूर्ण राज्यात काही टप्प्यांमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा एक टप्पा आणि त्यानंतर नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांचा दुसरा टप्पा असू शकतो, असे मानले जात आहे.

आजच्या संभाव्य सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देते, याकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!