उन्हाळी कांदा नाफेडमार्फत खरेदीसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा सकारात्मक प्रतिसाद – डॉ. भारती पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । नाशिक । राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन दिले. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन श्री. गोयल यांनी दिले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशभरातील साधारण 30.03 टक्के वाटा असलेल्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले परंतू अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्‍यांसाठी मागील हंगामातील लाल कांदा नाफेड मार्फत खरेदी केल्याने केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांचे आभार मानले असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिने सरकार प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी याकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

ग्राहक व्यवहार विभाग, (DOCA), अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते. कांद्याची खरेदी FPCs/FPOs मार्फत शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव APMC येथे प्रचलित बाजार दरांनुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते. राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत २०२२ मध्ये रुपये ३५१ कोटी रक्कमेचा २ लाख ३८ हजार १९६ मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रुपये १ हजार ४७५ प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांदा खरेदी करण्यात येईल, असे श्री. गोयल यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!