स्थैर्य, दहिवडी, दि. 10 : दहिवडी-फलटण रस्त्यावर असलेल्या वडगाव ते दहिवडी रस्त्यादरम्यान काही ठिकाणी रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे तसेच या मार्गात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला आहे. त्यामुळे या मार्गात लोकांना प्रवास करणे खूपच अवघड होऊन बसले आहे.
दहिवडी तालुक्याचे ठिकाण असल्याने रात्री-अपरात्री तसेच तिथून पुढे सांगली, मिरज, कराड, पंढरपूरला भाविकांची तसेच अवजड वाहनांची वर्दळ याच रस्त्यावरून होत असते. परंतु त्यावरून ही डांबर जाण्याची वेळ आली आहे. वडगावहून जाताना खंडोबा मंदिर ते जोडमैल दरम्यानच्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पुढे जवळपासच्या रस्त्यात तर खरबडीत झाला असून सगळीकडे लहान- मोठे खड्डे पडलेले आहेत. याच रस्त्यावर जणू पाण्याच्या विहिरी तयार झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खंडेराया झाली रस्त्याची दैना कुणीच लक्ष देईना असे म्हणता म्हणता या मार्गातून जाताना तरीही जीव माझा तुझ्याविना राहिना असेही प्रवाशांना म्हणावे लागते आहे. कारण या मार्गातून दररोज प्रवास करणार्या लोकांनी या रस्त्याची कदाचित सवयही लावून घेतली असेल. कारण या मार्गात अनेकांच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे. अनेक लोक या मार्गात असलेल्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत.
उद्योगधंद्यासाठी या मार्गावरून लोकांना ये-जा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच. दहिवडी ही मोठी बाजारपेठ असल्याने तसेच आठवड्यातून भरणार्या सोमवारच्या बाजारातून घरातील भाजी- पाल्यांपासून ते जनावरांच्या खरेदी- विक्रीपर्यंतचे सगळे व्यवहार इथे होत असतात. काही लोकं रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास नको म्हणून बिदाल मार्गाने दहिवडी तर वावरहिरे मार्गाने जास्त पैसे खर्च करून जातात. परंतु काहींसाठी रस्ता कसाही असो पण लोक खड्डे चुकवित ये-जा करतात. कदाचित या मार्गात ये-जा करणार्या लोकांनी आहे या परिस्थितीत या रस्त्यावर प्रेमही करायचे ठरविले असेल कारण आपली गाडी मार्गातून ये-जा व्हायची असेल तर यापेक्षा अजून रस्ता खराब होण्यापेक्षा हाच बरा असेही म्हणत असतील.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लोक हैराण
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खोळंबलेल्या चौपदरीकरणातील कामे त्या त्या गावांमधील नागरिक आणि प्रशासनानी योग्य तो मध्यम मार्ग काढणे गरजेचे आहे. रस्त्यात जर अशा पाण्याच्या विहिरी तयार होत असतील तर लोकांनी अजून किती दिवस हा रोजचा संघर्ष करीत राहायचे आहे.